Video: प्री-वेडिंग शूट...

प्री-वेडिंग शूट हल्ली खूपच कॉमन झालं आहे. वेगळ्या ठिकाणी जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करता येईलच असं नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आवर्जून शूट केलं जातंय. सोशल नेटवर्किंग साइट्सवरदेखील अशा प्री-वेडिंग शूटचा बोलबाला आहे. विवाहाचं चित्रीकरण करण्यापेक्षाही लग्नाआधी असे हटके अल्बम करण्याची इच्छा अनेक जोडपी व्यक्त करताना दिसतात.

लग्न सोहळा म्हटला की भरजरी कपडे, डिझायनर दागिने, मेकअप, हेअरस्टाइल अशा काही गोष्टी आजकाल अगदी महत्त्वाच्या असतात. संपूर्ण लग्न सोहळ्यातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या दृश्यस्वरूपात साठवून ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं. या लग्नसोहळ्याच्या फोटोसोबत ट्रेण्डिंग गोष्ट म्हणजे प्री-वेडिंग फोटोशूट! साखरपुडा आणि लग्न या दरम्यान साधारण हे फोटोशूट केलं जातं. आताची जनरेशन इतकी अ‍ॅडव्हान्स आहे की, प्री-वेडिंग शूटची संकल्पना आपल्याकडे फारच लवकर आणि सहज रुजली आहे.

(व्हिडिओ सौजन्य: यूट्यूब)

लग्नातले पारंपरिक कपडे आणि दागिने लेवून लग्नविधी आणि पाहुण्यांसोबतचे असे ठरलेले टिपिकल फोटो तर होतातच. याशिवाय वेगवेगळ्या कपडय़ांमध्ये, लुक्समधले फोटो काढायला प्रीवेडिंग फोटो शूट निमित्त असतं. एखाद्या निसर्गरम्य, रोमँटिक ठिकाणी जोडीने जाऊन हे खास शूट केलं जातं. दोघांकडचे कुटुंबीयही कधीकधी या फोटोशूटमध्ये समील होतात. पण या फोटोशूटमध्ये संपूर्ण फोकस हा त्या जोडप्यावरच असतो. वधूवरांची जर प्रेमाची गोष्ट असेल तर ती या फोटोशूटमधून उलगडली जाते. वधूवरांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे फोटोशूट केलं जातं. फोटोग्राफर या फोटोशूटसाठी नीट प्लॅनिंग करतात. वधूवरांचा वेळ घेऊन, खास लोकेशन ठरवली जातात. कपडे, अ‍ॅक्सेसरीज जाणीवपूर्वक निवडल्या जातात. अगदी कॅज्युअल वाटतील असे नैसर्गिक हावभाव या फोटोशूटच्या माध्यमातून टिपले जातात. लग्नात हवे तसे फोटो काढता येतातच असं नाही. ती कसर या प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून भरून काढली जाते.

शहराजवळची पण निसर्गाच्या सान्निध्यातली जागा प्रीवेडिंग शूटसाठी निवडण्याला तरुण जोडपी प्राधान्य देतात. पण एखाद्या कपलची लव्हस्टोरी शहराच्या गजबजाटात फुलली असेल आणि तीच छायाचित्रांच्या माध्यमातून मांडायची असेल तर मात्र शहराचीच पाश्र्वभूमी निवडली जाते.

प्रत्यक्ष लग्नासाठी जितका खर्च केला जातो, तसाच फोटोग्राफीवर देखील हल्ली केला जातो. प्री-वेडिंग, वेडिंग, रिसेप्शन, कॅण्डीड फोटोग्राफी असं पॅकेजच त्यासाठी असतं. लग्नसोहळ्याच्या रम्य आठवणी जपणं सर्वाना कायमच हवंहवंसं वाटतं. त्यातून चित्रपटांचा प्रभाव आणि ‘जिंदगी में एक बार..’ची हौस असा सगळा हा शूटिंगचा मामला आहे. हा खर्च पाहता भविष्यकाळात वधू-वर देशाबाहेर जाऊनदेखील प्री- वेडिंग फोटोशूट करु लागले तर आश्चर्य वाटू नये. त्यासोबतच सेल्फीला असणारी पसंती पाहता पुढे  सेल्फी काढूनच प्री-वेडिंग शूट होणंही शक्य आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि स्किल्स वापरून नवनवीन ट्रेण्ड येत आहेत. त्यातून प्रेमळ आठवणींना आणखी अविस्मरणीय करण्यात येत आहे; जेणेकरून आठवणींच्या रुपातले हे क्षण पुन्हा पुन्हा उलगडून पाहता येतील. त्यामुळे प्रेमाचा साक्षीदार असणारा हा प्री-वेडिंगचा अल्बम.. मुद्दाम निर्माण केलेली आठवण पण आयुष्यभर लक्षात ठेवायची साठवण म्हणून लोकप्रिय होत आहे.

बॉलीवूडपट आणि त्यांची गाणी आवडणारी जशी जोडपी आहेत तसंच अनेकांना हॉलीवूड चित्रपटातून ज्या पद्धतीने लग्नाचा सोहळा साजरा होतो त्या पद्धतीने किंवा डेस्टिनेशन वेडिंगचे परदेशातील व्हिडीओ पाहून त्या पद्धतीने शूट करताना दिसतात.

विवाहादरम्यान प्री-वेडिंगचे व्हिडिओ दाखवले जातात. यामुळे विवाहादरम्यान अनेकांना हे व्हिडिओ पाहायला मिळताना दिसतात. प्री-वेडिंग हा ट्रेंण्ड झाला असून, प्रत्येकजण हे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. शिवाय, प्री-वेडिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावरही अपलोड केले जातात. प्री-वेडिंग शूट मुळे फोटो ग्राफर व व्हिडिओ शूट करणाऱयांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते.